"सरकार आपल्या दारी"

या शेतकरी मिशनच्या मुळावा १२ एप्रिलला आयोजन / अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियान

 

दिनांक ११ एप्रिल २०१६
ग्रामीण जनतेला  महसूल,  कृषी, ग्रामविकास, वीज वितरण, अन्न पुरवठा, आरोग्य, रोजगार, शिक्षण,  पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या अनके समस्याना तोंड द्यावे लागत असून  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे ग्रामीण आर्थिक संकटात भर पडत आहे. शेतकरी - शेत मजुर - आदिवासी - दलित, निराधार, विधवांच्या अन्न पुरवठा, आरोग्य, वीज वितरण, महसूल, कृषी या विभागाच्या अनेक अडचणी समोर येत असुन ग्रामस्तरीय कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वीज कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे व तालुका स्तरीय अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या विलंबामुळे आता मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" हा उपक्रम शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी सुरु केला असुन मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली येथे दुष्काळग्रस्तांच्या तक्रारीची सुनावणी व समाधान केल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल,  कृषी, ग्रामविकास, वीज वितरण, अन्न पुरवठा, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी / कर्मचारी यांच्या तक्रारीची  १२ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता जनसुनावणी ठेवण्यात आली आहे अशी माहीती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी दिली.
या जनसुनावणी उमरखेड  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या प्रलंबित शेतकरी -शेत मजुर - आदिवासी - दलित, निराधार, विधवांच्या तक्रारीची सुनावणी व समाधान करण्यात येणार असुन या तालुक्यातील. शेतकरी - शेत मजुर - आदिवासी - दलित, निराधार, विधवां यांनी आपल्या तक्रारी द्याव्या अशी विनंती सुद्धा तिवारी यांनी केली आहे, हा  अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग असुन संपुर्ण विदर्भात व मराठवाड्यात  "सरकार आपल्या दारी" हा उपक्रम शेतकरी मिशन राबविणार असुन कामचुकार व लाचखोर तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी / कर्मचारी यांच्या कारवाई अहवाल सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती किशोर तिवारी  यांनी दिली . 
मुळावा येथील जनसुनावणीला   महसूल,  कृषी, ग्रामविकास, वीज वितरण, अन्न पुरवठा, आरोग्य, रोजगार, शिक्षण,  पोलीस प्रशासन या विभागाचे जिल्हा, उप विभागीय, तालुका स्तराचे सर्व अधिकारी व उमरखेड ग्रामस्तरीय अधिकारी / कर्मचारी उपस्थित असतील व या जनसुनावणीची सर्व व्यवस्था व आयोजन उपविभागीय अधिकारी महसूल, कृषी, पोलीस व वीज वितरण करतील.